Thursday, December 10, 2009

Wednesday, December 9, 2009

माझी भटकंती, भाग १ उंबरखिंड



माझी भटकंती, भाग १
उंबरखिंड




शिवाजीराजे आणि त्यांचा सखा सह्याद्री यांच्या मैत्रीबद्दल जेवढे वाचावे, जेवढे लिहावे तितके कमीच पडते. गेल्या महिन्यात आम्ही लेण्याद्री, ओझर, शिवनेरी, भीमाशंकर अशी सहल आयोजीत केली होती. मुंबई - ठाणे - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - जुन्नर - घाटघर या रस्त्यावरुन जाताना, सह्याद्रीची सुंदर आणि अनेकविध वेगवेगळी रुपे डोळ्याखालुन घालत आमचा प्रवास चालला होता. सकाळच्या रम्य वेळेस सह्याद्रीच्या डोंगररांगा पार करत असताना मध्येच जीवधन किल्ल्याचे दर्शन झाले. जीवधन किल्ल्यावरुन पुढे जात असतानाच, हरिश्चंद्रगडाच्या शिखरांचे नयनरम्य दर्शन झाले. आमच्या घरच्या वयस्कर माणसांचा आदेश आणि या सहलीचा उद्देश ओझर - लेण्याद्री - शिवनेरी - भीमाशंकर यांचे दर्शन करुन एका दिवसात मुंबई गाठायचीच असा असल्याने, बराचश्या दुर्गम किल्लांचे फक्त दुरुनच दर्शन घेऊन मनाचे समाधान करावे लागले. 

८.३०च्या सुमारास ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेउन आमची यात्रा लेण्याद्रीकडे निघाली. रस्ता इतका मस्तपैकी खराब होता, की जाता जाता पोट पार डचमळुन गेलं. खरी गम्मत मात्र आम्ही याच रस्त्यावर केली, मध्येच क्वालिसच्या टपावर चढुन भरपुर कच्च्या चिंचा काय काढल्या, पुढे मळ्यात जाऊन उसाचे अख्खेच्या अख्खे दांडे काय काढले, शेतात घुसुन ताजा ताजा फ्लॉवर घेतला, असो. साधारण  १०.००च्या सुमारास आम्ही लेण्याद्रीच्या पायथ्याशी पोहोचलो. इथे वयस्कर लोकांनी चढण्यासाठी बहिष्कार घातल्यामुळे आमची माकडसेना तब्बल ३५५ पायऱ्या चढुन गिरिजात्मजाच्या दर्शनास पोहोचली. देवळात अनपेक्षितरित्या आम्हाला गजाननाची आरती मिळाली. सकाळी १०.३० - १०.४५च्या सुमारास आरती होणं आणि आम्हाला त्यात सहभागी होता येणे ही गणेशाची कृपा. मन एकदम प्रसन्न झालं. आरती होताच,  पटकन छोट्याश्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही देवदर्शन घेतलं आणि तीर्थ प्रसाद घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो. मंदिरासमोर बांधलेल्या गच्चीत भाविकांची गर्दी उसळली होती, म्हणुन आम्ही क्षणभर गच्चीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर विसावलॊ. लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे मंदिर डोंगराच्या ऐन मध्यभागी आहे, आजुबाजुला बौद्ध धर्मियांची १८ लेणी आहेत, त्यातील ८व्या लेण्यास ’गणेश लेणे’ म्हणतात. आमच्यातले काहीजण ती प्रत्येक लेणी आत जाऊन बघुन आले. नंतर आमची वरात  गच्चीकडे वळली. अगदी भरदुपार असुनसुद्धा उन्हाचा अजिबात त्रास होणार नाही असा मस्त घोंघवता वारा वाहात होता. सहजच नजर चहुकडे भिरभिरु लागेली आणि अचानकच समोरच्या दिशेस स्थिरावली, पाहाते तर काय? समोर शिवाजी महाराजांच्या जन्मभुमीचे, शिवनेरीचे सर्वांग सुंदर दर्शन झाले.

मग काय, जितक्या भराभर (??) आम्ही पायऱ्या चढलो, त्याच्या दुप्पट वेगाने लेण्याद्री उतरलो. कारण? एकतर शिवरायांची जन्मभुमी साद घालत होती, आणि दुसरे कारण म्हणजे ............. कडकडुन भुक लागली होती. थोडीशी पोटपुजा करुन आम्ही शिवनेरीकडे कुच केले. इथे शिवाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही थेट बालेकिल्ल्याकडे सरकलो. शिवरायांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले, तसेच शिवराय व जिजाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही अंबारखान्याकडे वळणारच, ...... इतक्यात आभाळ भरुन आले, आणि अचानक अर्जुनाच्या बाणांसारखे बोचरे टपोरे थेंब पटापटा येऊन आम्हाला चिंब भिजवुन गेले. अगदी अनिच्छेने, निराश होऊन आमची वरात गाडीकडे वळली. 

आता शेवटचे ठिकाण म्हणजे भीमाशंकर. साधारण ४ तासांचा प्रवास. ४.५० - ५.०० च्या सुमारास आम्ही भीमाशंकर येथे पोहोचलो. या वेळेपर्यंत वातावरणात चांगलाच गारवा आला होता. मुख्य म्हणजे बऱ्यापैकी उशिर झाल्यामुळे देवळात जास्त गर्दी नाही मिळाली. ६.१५ पर्यंत देवदर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वातावरण बरेच थंडगार होते आणि चांगलेच अंधारुन आले होते. खुपच उशिर झाल्यामुळे येताना आम्ही तळेगावमार्गे येण्याचे ठरवले. भीमाशंकरावरुन तळेगावास येताना, रस्त्यात आम्हाला चाकण लागले. तिथुन पुढे जाता जाता एका बाजुला संग्रामदुर्गाचे भग्न अवशेष दिसले, आणि अचानकच इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडु लागली. 

चाकण, शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. रिक्त हाताने स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा ’भगवतझर्झर’, किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन चाकणकडे निघाले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा त्यांनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.

शहिस्तेखानाच्या फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे मातीचं छोटसं ढेकुळ, तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक ’क्षुद्र किल्ला’ घ्यायला तब्बल ५५ दिवस लागले. खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, शिवाजी शिवाजी तो काय, त्याला अस्सा पंजात पकडीन आणि आपल्या लाडक्या भाच्याकडे घेऊन जाईन. त्यात शिवाजीचे राज्य म्हणजे इवलेसे, एकदा का कोकण किनारपट्टीवर कब्जा केला, की शिवाजी पळुन पळुन असा जातो कुठे? खरचं कित्ती सोप्पं? त्यातच या खानाबरोबर असलेली अवाढव्य फौज, हत्ती किती, उंट किती, तोफा किती, घोडे किती, आणि त्याच्या हाताखाली असलेले सरदार, दरकदार तर एकापेक्षा एक नामवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, मग कसली आहे काळजी, आणि कसली आहे भीती.

खरं तर ज्या तयारीने शहिस्तेखान मराठी राज्यात उतरला होता, त्या तयारीकडे बघुन सह्याद्री खदाखदा हसला असेल. तसं खानानखान शाहिस्तेखान काही कमी ताकदीनीशी आला नव्हता. केवढी अवाढव्य फौज ती ! औरंगाबादेबाहेर जणु आणखी चार - पाच शहरे एकवटुन बसल्यासारखी दिसत होती. एकुण सत्त्याहत्त हजार घोडेस्वार आणि सुमारे तीन हजार पायदळ जय्यत तयार होते. कझाकी, पठाणी, उझबेगी, गोंड, बख्सारी, अरबी, मोघली, रजपुती, बुंदेले वगैरे अत्यंत नामवंत नामांकीत जातीचे धिप्पाड लढवय्ये या फौजेत होते. हे कमी की काय, म्हणुन आपले मराठेपण होते. त्र्यंबकजी भोसले, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाडगे, कमळोजीराव कोकाटे, त्र्यंबकराव खंडागळे, अंताजीराम खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे, आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावुन खाशी भोसले मंडळी, त्र्यंबकराव भोसले, जिवाजीराजे भोसले, बाळाजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले. महाराजांचे सख्खे चुलत भाऊ, चुलते, पुतणे, रक्ताचे भाऊबंद. काय करणार, या सगळ्या मंडळींना महाराजांपेक्षा शहिस्तेखानच आप्त स्वकिय वाटत होत ना! शाहिस्तेखानाच्या स्वारीची मुकम्मल तयारी झाली. हरावल फौजेचे झेंडे पहिल्या मंझीलवर रवाना झाले. पुढच्या मुक्कामासाठी पेशखाना रवाना झाला. कुचाची नौबत दणाणली, आणि नबाब शाहिस्तेखान निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सैन्य चालू लागले. ती तोफांची रांग, पलीकडे ती हत्तींची रांग आणि ही सरदारांची रांग.

या सरदारांबरोबर एक स्त्री पण घोड्यावर स्वार होऊन चालली होती, एक अस्सल महाराष्ट्रीयन ब्राह्मण स्त्री, ती होती पंडीता रायबाघन. अत्यंत कर्तबगार, मुत्सद्दी, प्रचंड अभिमानी. मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई उर्फ रायबाघन या दोघीही वऱ्हाड प्रांताच्या लेकी, फक्त एक तफावत होती, एकीने आपल्या सुपुत्राला शिकवली बंडखोरी, आणि दुसरीने शिकवण दिली गुलामगिरीची !

२८ जानेवारी १६६० रोजी स्वराज्याच्या रोखाने निघालेला खान, मजल दरमजल करत, आपला सैन्यासागर संभाळत, रस्त्यात येतील ते मुलुख तसनस करत, मुलुखावरुन आपल्या स्वारीचा वरंवटा फिरवत, गावेच्या गावे ओसाड करत, महाराजांच्या शक्य तितक्या रयतेला छळत, नागवत, त्रस्त करत सुटला होता. औरंगाबाद - मिरज - अहमदनगर - सुपे - बारामती - शिरवळ - शिवापुर - सासवड - राजेवाडी - हडपसर - या मार्गाने ९ मे १६६० रोजी पुण्यात येऊन पोहोचला. शाहिस्तेखानाने लाल महालाचा उंबरा ओलांडुन आत पाऊल टाकले, वाडा विटाळला.

स्वराज्यावर दुहेरी संकट आले, महाराज पन्हाळांत अडकुन पडलेले आणि नेमका त्याच वखताला शहिस्तेखान नावाचा हिरवा अजगर लालमहालात शिरला. राजगडावर माँसाहेबांच्या जीवाची तगमग तगमग झाली होती. त्यांच्या काळजाचा तुकडा पुरंधरावर अडकलेला, शाहिस्तेखानाची प्रचंड लाट पुण्यापर्यंत पोहोचलेली, नेताजींचा पराभव झालेला, मोघलांनी स्वराज्याचा बराचसा लचका तोडलेला.  आणि ही परिस्थिती कमी पडली म्हणुन की काय म्हणुन २१ जुन १६६० रोजी शाहिस्तेखानाने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातल्याची खबर येऊन पोहोचली. जणु स्वराज्याचा घास घेण्यासाठी चहुबाजुने शत्रु ’आ’ करुन येत होता.

वेढ्याचे ५ - १० दिवस उलटले, फिरंगोजींच्या जान-निसार मावळ्यांचे शाहिस्तेखानाच्या फौजेची फिरकी घेणे चालु होते. मोघलांना थोडे थोडे पुढे येऊन द्यायचे, आणि फौज टप्प्यात आली की बुरुजावरुन तोफा डागायच्या, त्याच्या माऱ्याखाली कित्येक सरदार गारद होत असत. शाहिस्तेखानाने कितीतरी दारुगोळा उडवला होता, पण त्याच्या माऱ्याने बुरुजांवरचा छोटासा दगडसुद्धा हलला नव्हता. तिकडे जरी राजे नामुष्कीच्या कैदेत पडले होते, तरी चाकण मात्र मस्तवालपणे त्याच्यावर येणारा प्रत्येक हल्ला परतवत होता. २ मार्च १६६० पासुन पन्हाळ्यावर अडकलेले राजे १२ जुलै १६६० रोजी बाजीप्रभुंच्या मदतीने हुशारीने पन्हाळ्यावरुन निसटले. १३ जुलै १६६० रोजी सर्व अडचणी पार करुन, सुर्यराव आणि जसवंतसिंग यांचा समुळ पाडाव करुन यशवंत राजे आपल्या सैन्यासह विशालशैल येथे सुखरुप पोहोचले. विशाळगडी पोहोचल्यावर राजांबरोबर पन्हाळ्यावरुन निसटलेल्या जखमी अवस्थेतील अनेकविध सैनिकांच्या जखमा बऱ्या होईपर्यंत त्या सर्वांनी तेथेच सक्तीचा आराम करायचा आदेश देऊन हा लोककल्याण राजा राजगडी परतला.

तब्बल एक वर्षांनी दिग्विजयी राजे सुखरुप आईच्या कुशीत पोहोचले, आपल्या सुपुत्राला जवळ घेताना त्या मातेच्या मनात आनंदाचा पुर आला असणार, ती भावना जाणुन घ्यायला फक्त राजे आणि मासाहेबच समर्थ होते. शिवराय पन्हाळ्याच्या कैदेतुन राजगडी पोहोचले, तरी बिच्चारा शाहिस्तेखान एका चाकणला वेढा घालुन बसला होता. महाराज सुटल्याची खवर ऐकुन शाहिस्तेखानाला नाही म्हटलं तरी थोडा घक्का बसला असणारच.

शहिस्तेखानानी वेढा दिलेला चाकण आणि त्याच्या अंगाखांद्यावरचे गडकरी मस्तपणे मुघल फौजेचे हाल बघत होते. महिना - दीड महिना उलटुन गेला तरी चाकणवर चाँद-तारा फडकला नव्हता, काय करावे, चाकण कसा जिंकावा, त्याच्यावर बंदुकांच्या, तोफांच्या माऱ्याचा परिणाम होत नाही, आपले सैन्य चाकणवर आक्रमण करुन घेल्यावर तोंडघाशी पडते, जेवढे सैन्य जाते त्यातले  सैनिक एकतर जखमी होऊन येतात, नाही तर येतच नाहीत. हे येवढसं मातीचं ढेकुळ पण अजुनही आपल्या कब्जात येत नाही. काय करावे, कोणती शक्कल लढवावी याचा शाइस्तेखान विचार करत होता. शेवटी अगदी कंटाळुन त्याने एक खतरनाक योजना राबवली, स्वत:च्या तळापासुन किल्ल्यापर्यंत एक भुयारी मार्ग तयार करुन घेतला, आणि १५ ऑगस्टला ( तब्बल ५५व्या दिवशी ) या भुयारात किल्ल्याजवळ प्रचंड शक्तिशाली सुरुंग पेटवुन किल्ल्याला मोठे खिंडार पाडले, मराठ्यांनी हा हल्ला उलटुन लावायचा जीव पणाला लावुन प्रयत्न केला, पण इतक्या दिवसांनी विजयाची चाहुल लागलेली मोघली फौज खुप अनावर ठरली आणि बघता बघता फौज किल्ल्यात शिरली, चाकण पडला. शाइस्तेखानाच्या सैन्याला जणु स्वर्ग २ बोटं उरला असेल. ५५ दिवसांनी, पाठीवर वार करुन का होईना, पण शिवाजीचा एक भुईकोट किल्ला जिंकला, कित्ती हुश्शार.

आता काय, एक किल्ला घेतलाच आहे, एका मागुन एक किल्ले घेऊ आणि शिवाजीला सहज कैद करु. त्याचे मनसुबे अस्मानाला जाऊन भिडले. चला, औरंगजेबाच्या रागाला शांत करण्यासाठी काही तरी कारण सापडले, त्याने तातडीने दिल्लीकडे विजयाची वार्ता असलेला खलिता पाठवुन दिला. इकडे दिल्लीला औरंगजेब वेडा व्हायचीच वेळ आली होती, इतके सैन्य घेऊन गेलेला त्याचा मामा काय शिवाजीचा पाहुणचार घेतोय, की नुसतीच शराब आणि नाचगाण्यात मग्न आहे, त्याच्या कलेजाला ठंडक मिळेल अशी एकही खबर येत नव्हती. ना शिवाजी पकडला जात होता, ना त्याचे किल्ले कबजात येत होते, ना त्याचे स्वराज्य कबजात येत होते. त्याने शाहिस्तेखानाला अतिशय खरमरीत खलिता पाठवला, आणि त्यात स्पष्टपणे लिहिले की शिवाजीचा मुलुख काबीज करा. नाही म्हणायला तो पर्यंत शाहिस्तेखानाने आदिलशाहीचा परिंडा किल्ला जिंकुन घेतला होता.

शहिस्तेखानाने पाठवलेला चाकण विजयाचा खलिता वाचुन बादशहा आनंद झाला असावा, त्यात पाठोपाठ परिंडा विजयाचा खलितापण मिळाला. औरंगजेब एकदम खुश झाला. त्याला विश्वास वाटु लागला की, अमीर उल उमरा शाहिस्तेखान मामा नक्की दख्खन सर करणार. मामांच्या दिमतीला त्याने अजुन फौज पाठवुन दिली. 

पर्जन्यकाळ संपला होता, राजांची फौजपण एकदम ताजीतवानी झाली होती. राजे शाहिस्तेखानाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते, अजुनपर्यंत त्याने महाराजांचा एकही डोंगरी किल्ला जिंकला नव्हता, चाकणसारख्या भुईकोटाने शाहिस्तेखानाला आणि त्याच्या फौजेला चांगले पाणी पाजले होते, तिथे डोंगरी किल्ल्यांकडे वाकडी नजर करुन बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती, पण औरंगजेबाचा खलिता वाचुन त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. शिवाजीचे स्वराज्य कसे संपवावे यावर पुण्याच्या लालमहालात बसुन आराखडे बनवले जात होते, आधी डोंगरी किल्ले घ्यावे की आधी कोकण किनारपट्टी जिंकुन घ्यावी. चाकणच्या किल्ल्याने शहाणा झालेल्या खानाने ठरवले, आधी कोकण किनारपट्टीवर आपला अंमल बसवावा. एकदा का कोकण किनारपट्टी मुघलांच्या ताब्यात आली की शिवाजीचे आरमार आपोआप संपुष्टात येईल. बेत ठरला, आधी कोकण.

खान अगदी एकांतात जाऊन बसला आणि त्याने आपला खास सरदार उझबेग कारतलबखान याला याद फर्मावले. कारतलबखानास त्याने चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे हस्तगत करण्यास फर्मावले. आपल्या पराक्रमाने परिंडा किल्ला हस्तगत केलेल्या कारतलबखानाने हसत हसत ही मोहीम स्वीकारली. त्याच्याबरोबर कुमकेला खानाने मित्रसेन, कछप, सर्जेराव गाडे, जादोराव, अमरसिंह चौहान, जसवंतराव वगैरेंबरोबरच रायबाघनलापण कुच होण्यास सांगितले.

रायबाघन, एक ब्राह्मण स्त्री मोघल फौजेत सामिल झाली होती, तीचे खरे नाव होते, सावित्रीबाई, वऱ्हाडातील माहुरच्या राजे उद्धवराव देशमुखांच्या पत्नी. उद्धवराजांनी आमरण मोघलांची सेवा केली. त्यांचा पुत्र जगजीवनराव सुद्धा मोघल साम्राज्याकरता बळी पडला. घराण्यात पुरुष राज्यकर्ता कुणीच न राहिल्याने सावित्रीबाईने आपल्या एकटीच्या अधिपत्याखाली वऱ्हाड प्रांताचे परकिय आक्रमणापासुन संरक्षण केले, वऱ्हाड मोघली प्रांतातच राहिले. औरंगजेब बादशहाने खुश होऊन सावित्रीबाईला ’पंडिता’ आणि ’रायबाघन’ असे किताब बहाल केले. रायबाघन, राजव्याघ्रीण, वाघिणीसारखी शुर, चपळ, आपल्या भक्षाचा अचुक लचका तोडणारी. 

भरपुर फौजफाटा, हत्ती, तोफा वगैरे बरोबर घेऊन, शाहिस्तेखानाचा निरोप घेऊन कारतलबखानाने पुण्यावरुन कुच केले. खरं तर पुण्यावरुन कोकणात उतरायला त्यावेळी दोन रस्ते होते, एक बोरघाट मार्गे, आणि दुसरा उंबरखिंड मार्गे. आता येवढी मोठी फौज घेऊन बोरघाटामार्गे कोकणात उतरणं सोपं होत, कारण बोरघाटातला रस्ता  जरा मोकळा होता, पण त्याचबरोबर मराठ्यांच्या अचानक आक्रमणापासुन आपला बचाव करण्याच्या हेतुने कारतलबखान चिंचवड - तळेगाव - वडगाव मार्गे कोकणाच्या दिशेने निघाला.

कोकणात जायला तर फौज निघाली खरी, पण कोकणातले रस्ते कसे आहेत, नक्की कुठची वाट कोकणात घेऊन जाईल, हत्ती, तोफा जाऊ शकतील की नाही याची काहीही माहीती त्याला आणि त्याच्या फौजेला नव्हती. कारतलबखानचा सैन्यभार तळेगाववरुन मळवलीकडे सरकला. लोहगडाजवळुन त्याची फौज पुढे सरकत होती. ही वाट म्हणजे सह्याद्रीच्या अवघडपणाचे एक सुंदर उदाहरण होते, उंचच उंच डोंगर, आणि खोल खोल जाणाऱ्या दऱ्या. कोणाही नवख्यामाणसाला सह्याद्रीत नुसता पाय ठेवणे म्हणजे महाकठीण कर्म. ज्या वाटेने त्याची सेना मार्गक्रमण करत होती, तो मार्ग म्हणजे सह्याद्रीच्या लेकरांसाठी साधी सोपी पाऊलवाट. खानाच्या सैन्याला तर अफाट अरण्य व चहुकडे सह्याद्रीची उंच उंच शिखरे दिसत होती. येवढ्या कठिण वाटेने जाताना सैन्य पावलापावलावर थकत होतं.  त्यातुन   कारतलबखान त्याच्या बरोबर तोफा हत्ती उंट घेऊन लोहगडाच्या दक्षिणोत्तर असणाऱ्या वाटेवरुन खाली तुंगारण्यात उतरायचे आणि नंतर अख्खा सह्याद्री चढुन उंबरखिंडीतुन कोकणात उतरायचे अशा तयारीने आला होता. ही वाट तर अतिशय खडतर, दाट अभयारण्यातुन जाणारी, अतिशय कठिण डोंगरदऱ्यातुन जाणारी, अरुंद, निर्जन आणि महाभयानक होती. प्रत्यक्ष उंबरखिंडीत तर अतिशय घनदाट अरण्य होते, आणि खिंडीतुन जाणारी वाट इतकी दुर्गम होती, की एका वेळेला एकच माणुस त्या वाटेवरुन जाऊ शकत असे. 

गोगलगाईच्या चालीने कारतलबखान आणि त्याची फौज मार्गक्रमण करत होती. हाश्श हुश्श करत कशीबशी फौज तुंगारण्यात पोहोचली, नव्हे नव्हे शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी खानाच्या फौजेला तुंगारण्यात सुखरुप उतरु दिले. त्याच्या पुढचा मार्ग मात्र असंख्य अडचणींचा होता, उंच आणि सरळ सोट वाट, एका एका सैनिकाला तोंडाला अशी चढण चढताना फेस येऊ लागला. कधी आयुष्यात सह्याद्रीचे दुरुनसुद्धा दर्शन न घेतलेले हजारो हशम आता ह्या सह्याद्रीला ढुश्या देत देत त्याच्या आडवाटांतुन ह्या डोंगराकडुन त्या डोंगराकडे फिरत होते.

मोठ्या परिश्रमाने खान मध्यापर्यंत आला, अजुन उंबरखिंडीत पोहोचण्यासाठी संपुर्ण पर्वत चढायचा होता. मोघली फौज तर पार वैतागुन घेली होती, एक एक पाउल पुढे टाकताना त्यांना असंख्य वेदना होत होत्या. प्रत्येकाला आपण आत्ता तोल जाऊन पडतोय की काय असे वाटत होते. तहानेने आणि भुकेने हैराण झालेली फौज कशीबशी उंबरखिंडीच्या वाटेवर येऊन थांबली. त्या रात्री कारतलबखानाने मुक्काम केला, फौजेचे होणारे अनिन्वित हाल तो पहात होता, स्वत: त्रास सहन करत होता, पण काहीही केल्या ऊंबरखिंड पार करुन कोकणात उतरायचेच असा चंग बांधला होता त्याने. रायबाघनला सैन्याचे होत असलेले हाल पहावत नव्हते.
              
आणि दुसरीकडे राजांची ताजीतवानी फौज खानाचे आणि त्याच्या सैन्याचे होणारे हाल ऐकुन होती. खानाचे सैन्य तुंगारण्यात पोहोचण्यापुर्वीच मावळे जागोजागी लपुन बसले होते. विसापुर आणि लोहगडाच्या टप्प्यामधुन खान कोकणात उतरतो आहे, हे बधुन सुद्धा शिवरायांची फौज निवांत होती, एकदा का खान तुंगारण्यात उतरला की भयानक अरण्यात त्याच्या सैन्याला यथेच्छ झोडपुन काढायचे या इराद्याने शांत होती. उंबरखिंडीतील निसर्गसौंदर्य बघुन राजे तृप्त झाले. त्यांच्या सैन्याने मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षांच्या गर्द पालवीत टेहळेकरी बसले होते. जंगलात जिथुन जिथुन वाट दिसेल, अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे लावले गेले. राजे आता कारतलबखानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पहात होते.

खानाने आपल्या फौजेला कुच करायची आज्ञा दिली. रायबागन एक शब्दही न बोलता सैन्याबरोबर चालु लागली. फौज कशीबशी अरण्याच्या ऐन मध्यावर आली आणि इतकावेळ असलेल्या भयानक शांततेला भंग करीत जबरदस्त तडाखा देणारी शिंगे किंचाळली. कारतलबखानाचे थकलेले सैन्य भीतीने चळाचळा कापु लागेले. सभोवार वळुन पहातात तर कोणीही दिसत नाही, मग शिंगांचे आवाज कुठुन येतात, ही भुताटकी तर नव्हे? इतक्यात नौबती वाजु लागल्या, आणि अचानक प्रत्येक झाडामागुन एक एक मावळा पुढे पुढे सरसावताना दिसु लागला. इतकावेळ शांतपणे झाडीत चढलेले, झाडांवर दडलेले, सांदीसपाटीत लपलेले शेकडो मावळे तलवारी उंचावुन हर हर महादेवचा जयघोष करत अंगावर धावुन गेले. अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरुन गेलेली होती. खानाला या झालेल्या हल्ल्याला कसे तोंड द्यावे, काय करावे हे अजिबात कळत नव्हते, आणि त्यातच समोरुन नेताजी पालकर दौडत येताना दिसले.

कारतलबखानाच्या सैन्याची पुरती कोंडी झाली होती, तोंडाला कोरड पडली होती, कुठुन कुठचा बाण, भाला येईल आणि आपल्या कंठाचा भेद घेईल हे काही काही कळत नव्हते त्याच्या सैनिकांना. जिकडे बघावे तिकडे जंगल, आणि डोळ्यात रक्त उतरलेले मावळे याशिवाय काही काही दिसत नव्हते. सैन्याच्या पिछाडीला असलेल्या रायबागनकडे असहाय्यपणे पहात कारतलबखान सैन्याला यल्गार करण्याची आज्ञा देत होता, पण कोणा एकाच्या अंगात मावळ्यांच्या दिशेने एकही पाउल चालुन जाण्याइतका जोर नव्हता. तोच तोफेचा आवज साऱ्या अरण्यात दुमदुमला. तोफगोळ्यांच्या अचुक माऱ्यात मोघली सैनिक मारले जात होते, मुडद्यांचे ढीग पडले होते.

ही कोंडी असह्य होऊन आता मात्र रायबाघन कारतलबखानावर कडाडली. त्याने त्याच्या स्वत:च्या अक्कलहुशारीमुळे सरळ सोप्या रस्त्याने जाण्याऐवजी हा महाभयंकर मार्ग निवडुन मृत्युला आमंत्रण दिले होते. बादशहाची अजिंक्य (??) फौज, कारतलबखानाने त्याच्या मुर्खपणाने शिवाजीच्या हातात अलगद आणुन सोडली होती, आणि आता तो स्वत: घाबरला होता, म्हणुन तिने यथेच्च खानाला सुनावले. त्याचबरोबर जर जान प्यारी असेल, तर ताबडतोब शिवाजीला शरण जा, त्याच्याकडे वकिल पाठव, तरच मोघली फौज या मुसिबतीमधुन जिवंत बाहेर पडु शकेल असा सल्ला ही दिला. खरं तर कारतलबखानाला तिचा भयंकर राग आला होता, एक स्त्री असुन प्रत्यक्ष शाइस्तेखानाने निवडलेल्या सिपाहसालारवर सगळ्या सैन्यासमोर ओरडते म्हणजे काय? पण, मोघल सैन्याची होणारी दाणादाण पाहुन त्याला रायबाघनचा सल्ला मनोमन पटला, आणि स्वत:चा अपमान, महत्वाकांक्षा, लाजलज्जा बाजुला सारुन निरुपाय म्हणुन त्याने आपला वकिल शिवरायांकडे पाठवला. 





खानाने निवडलेला वकिल झाडाझुडुपातुन मार्ग काढन निघाला. लांबुनच त्याला उंबरखिंडीच्या तोंडावर सफेद घोड्यावर बसलेली महाराजांची अतिसुंदर, अतितेजस्वी छबी दिसली. महाराजांच्या क्षात्ररुपाचे वर्णन म्या पामराने काय करावे, राजांनी अंगात पोलादी चिलखत व मस्तकी शिरस्त्राण परिधान केले होते. शिरस्त्राणाची जाळीदार झालर मानेवर रुळत होती. मनगटावर, छातीवर, पाठीवर व कमरेवरच्या सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्या चिलखतात गुंभल्या होत्या. पायांत पांढरी सुरवार होती. कमरेवर तलवार लटकत होती. पाठीवर मोठी ढाल बांधली होती. कानांत गुलाबी रंगाची झाक फेकणारे मोत्यांचे चौकडे होते. भव्य कपाळ, गरुडासारखे नाक, भरीव भुवया, पाणिदार दिलखेचक डोळे, काळीभोर खुलुन दिसणारी दाढी आणि पौर्णिमेच्या चंद्रानेही लाजुन मान खाली घालावे, असे चेहेऱ्यावरचे स्मितहास्य..... रणांगणावर इतके राजबिंडे रुप पाहुन प्रत्यक्ष समोर उभा ठाकलेल्या शत्रुनेही दोन मिनिटे पहातच रहावे, ऐसे देखणे रुप.  

कारतलबखानाचा वकिल महाराजांच्या नजिक गेला आणि कुर्निसात करुन त्याने आपल्या मालकाचे म्हणणे राजांसमोर ठेवले. मोघली फौजा बततमीजी करुन राजांच्या मुलुखात शिरल्या, त्याबद्दल खानसाहेब सख्त दिलगीर आहेत. खानसाहेब विना तक्रार राजांना शरण आले आहेत, त्यांना राजांनी एकवार माफ करावे, मोघली सैन्याला  धर्मवाट द्यावी, सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरप्रदेशाची आमच्या सैन्याला कल्पना नव्हती, ह्या प्रदेशाच्या अजिंक्यपणाचा अंदाज न आल्यामुळे आणि नबाब शाइस्तेखान यांनी केलेल्या आज्ञेमुळे खानसाहेबांच्या हातुन अशी चुक झाली, सिपाहसालार कारतलबखान आणि आपले वालिद राजा शहाजी यांचा जुना दोस्ताना होता, खानसाहेब शहाजीराजांवर मुहोब्बत करीत असत, आम्ही लगेचच तुमच्या मुलुखातुन निघुन जातो, पुन्हा कधीही आमच्या नजरा तुमच्या मुलुखाकडे वळणार नाहीत,  आमच्यावर विश्वास ठेवा, आपले उपकार होतील. आम्हाला या अरण्यात साधे पाणी सुद्धा मिळाले नाहीये, आम्हाला अभयदान द्या.

जीवावर बेतल्यामुळे बरी जुनी नाती आठवत होती कारतलबखानाला. राजांनी त्या वकिलातर्फे निरोप पाठवला, त्याला आणि त्याच्या मोघल सैन्याला राजांनी अभयदान दिले, पण त्या बदल्यात खानाकडुन भक्कम खंडणीची मागणी केली. राजांचा निरोप घेऊन वकिल कारतलबखानाकडे आला, राजांचे बोलणे त्याने खानाच्या कानावर घातले. येवढे होईपर्यंत खानाची अर्ध्यापेक्षा जास्त फौज जखमी झाली होती, गारद झाली होती. भरभक्कम खंदणी द्यायला लागेल, पण आपला जीव तरी वाचेल, असा विचार करुन खानाने राजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि लागोलाग हा निरोप घेऊन आपल्या वकिलाला राजांकडे पाठवला.

या वेळेला मात्र वकिलाबरोबर एक तरुण घोड्यावर स्वार होऊन त्याच्या बरोबर उंबरखिंडीच्या तोंडाकडे मार्गक्रमण करत होत, आणि क्षणातच त्याचा घोडा पुढचे दोन्ही पाय वर उचलुन खिंकाळला, आणि एका जागेवर खुर दणादणा आपटुन उभा राहीला. तो तरुण आपले डोळे विस्फारुन एकटक समोर घोड्यावर स्वार असलेल्या राजांकडे बघतच राहिल. त्यांच्या किर्तीचे अनेक किस्से त्याने ऐकले होते, पण आज पहिल्यांदाच त्याचा अनुभव आला होता. आपल्या कमरेची तलवार त्या तरुणाने राजांना नजर केली. राजांनी एक क्षणभर त्या तरुणाकडे पाहिले व दुसऱ्याच क्षणी घोड्यावरुन पाय-उतार होऊन त्या तरुणासमोर आले आणि आपले दोन्ही हात जोडुन त्यांनी त्या तरुणाला नमस्कार केला व म्हणाले, "आपल्यासारख्या असामान्य योध्याची तलवार आम्ही घेणे उचीत नाही, आम्ही तुमच्या परक्रमाचे कौतुक करतो. तुम्हाला मिळाळेला ’रायबाघन’ हा खिताब सार्थ आहे. आज एका वीरस्त्रीचे आम्हास दर्शन झाले, आम्ही धन्य झालो." रायबाघनला शब्द सुचत नव्हते, राजांनी दिलेल्या सन्मानामुळे ती भारावुन गेली होती.

महाराजांनी आपल्या साथीदारांना लढाई थांबवण्याचा आदेश दिला, तो पर्यंत मराठ्यांनी चांगली लुट केली होती. कारतलबखानाने ठरल्याप्रमाणे मोठी खंडणी राजांकडे पाठवुन दिली. उंबरखिंडीत मोघल सैन्याचा दणकुन पराभव झाला. खानाने त्याच्या बरोबर आणलेले मौल्यवान सामान, युद्धसाहित्य, खजिना, तसेच हत्ती, घोडे, सोन्या-चांदीची भांडी, विविध अलंकार वगैरे गोष्टी तिथेच टाकुन दिले, आपला जीव वाचवण्यासाठी भराभर पुण्याकडे माघारी फिरला. ( २ फ़ेब्रु. १६६१ )

इकडे राजांच्या विजयाने बेभान झालेल्या सैन्यानी आपल्या विजयाच्या आरोळ्यांनी, कर्णे, शिंगे वाजवुन उंबरखिंड दणाणुन सोडली. खानाने टाकुन दिलेले बहुमुल्य सामान अवचितच राजांच्या कब्जात आले. उंबरखिंडीतली लढाई फार फार वेगळी होती, शत्रुच्या कोट्यावधी फौजेला मुठभर सैन्याने नामोहरम करुन विजयीश्रीची माळ आपल्या कंठात घालुन घेतली होती. पावनखिंडीपाठोपाठ गाजलेली ही दुसरी खिंड - उंबरखिंड. या दोन्ही लढाईत राजांच्या कुमकेला कोण होते तर त्यांचे मावळे, आणि त्यांचा जीवलग सह्याद्री. उंबरखिंड ही सह्याद्रीच्या आतल्या अंगाला असुन सर्व बाजुने उंचच उंच डोंगर, दाट अरण्य. महाराज आणि सह्याद्री, दोघांनीही खानाला खिंडीत घाठुन झोडपुन काढलं.






गेल्यावर्षी म्हणजे २० डिसेंबर २००८ ला मी पहिल्यांदा उंबरखिंडीत गेले होते, डिसेंबर महिना असल्यामुळे अंबा नदीला अजिबात पाणी नव्हते, फक्त काही ठिकाणी छोटी छोटी पाण्याने भरलेली डबकी होती. त्याचा फायदा असा झाला, की उंबरखिंड आणि छावणी ज्या ठिकाणी रायबाघन आणि कारतलबखान, दोघेही राजांना शरण आले, तिथे राजांच्या विजयाचे एक स्मारक बनवले आहे; त्या स्मारकापर्यंत जाता आले. हे स्मारक अंबा नदीच्या पात्राच्या ऐन मध्ये बांधले आहे, आणि पावसाळ्यात अंबानदी फोफावुन वाहात असते. त्या पाण्याच्या प्रवाहातही हे विजयाचे स्मारक कोणतीही इजा न होता सुरक्षित रहावे या हेतुने थोडे उंच जोत्यावर बांधले आहे. स्मारकावर शिवरायांचे रणवेषधारी अश्वारुढ चित्र कोरले असुन, दुसऱ्या बाजुला उंबरखिंडीच्या संपुर्ण लढाईची माहीती कोरली आहे. स्मारकाच्या मस्तकी मराठमोळी अर्थात ढाल-तलवार, धनुष्यबाण, भाला वगैरे हत्यारे बसवली असुन, त्याच्याच बाजुला हिंदु साम्राज्याच्या ह्रुदयात आजही स्वत:चे स्थान जपणाऱ्या, आणि कित्येक किल्ल्यांवर मानाने फडकणाऱ्या भगव्या झेंड्याचे प्रतिक म्हणुन पत्र्याचा झेंडा बसवला आहे.

या घटनेला ३४८ वर्षे पुर्ण झाली असली तरीही आजही उंबरखिंडीत गेल्यावर शिवराय आणि त्यांचे मावळे इथेच कुठे तरी जवळपास आहेत असा भास होतो. उंबरखिंडीचा खडतरपणा, बिकटपणा आजही अनुभवता येतो. उंबरखिंडीच्या सभोवती असलेले सह्याद्रीचे अजिंक्य कडे या घटनेचे साक्षीदार आहेत. आपण सगळे जण खुप नशिबवान आहोत, म्हणुन आपला जन्म महाराष्ट्रात झाला, आज इतक्या वर्षांनीसुद्धा आपल्याला राजांच्या चरणस्पर्शानी पावन झालेल्या भुमीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे. आपले नशिब थोर म्हणुन आपल्याला असा अलौकिक राजा आणि त्यांचा सखा सह्याद्री मिळाला. शिवरायांवर, त्यांच्या वंशजांवर, आणि शिवरायांचा सखा सह्याद्रीवर मनापासुन प्रेम करणाऱ्या इतिहासप्रेमींनी निदान एकदा तरी भरपावसात उंबरखिंडीत जाऊन त्या स्मारकाचे दर्शन घ्यायला हवे. तो थरार निदान एकदा तरी अनुभवायला हवा.


Ref. : Raja Shivachhatrapati by Babasaheb Purandare
     The Gazetteers Department, Maharashtra
     Maratha History, Mr. Oswald Spengler